पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होणार

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली असून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्ट्यांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामं करण्याचे आदेश दिले. या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्नही मार्गी लागला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर पासून या कामाला सुरूवात होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह या परिसराची पाहणी करून कोणत्या गोष्टी प्राधान्याने करावयाच्या आहेत याचा आढावा घेतला. यामध्ये जुना गवळीपाडा येथे मुख्य रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण, शौचालय जोडणी, विद्युत खांब बसवणं, गटारं बांधणं, मोबाईल हेल्थ सेंटर उपलब्ध करून देणं अशा सुविधा देण्याबाबत पालिका आयुक्तांनी आदेश दिले. त्याचप्रमाणे परिसरात कचरा-कुंड्या बसवणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, नाल्याचे बांधकाम करणे, शिवाजीनगर भागातील नाल्यांची साफसफाई, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शौचालयांची साफसफाई, पंजाबी कॉलनी, आदर्श वसाहत, गौतम नगर, रामवाडी या परिसरात नालेसफाई, नाले खोल करणे आणि गटारं साफ करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. या परिसरात असलेल्या आठही झोपडपट्ट्यांची मिसाल मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. यापूर्वी त्यांनी इंदिरानगर, डोंगरीपाडा येथील झोपडपट्ट्यांचं रूपडं बदललं होतं. गेल्या ४० वर्षापासून या ठिकाणी लोकवस्ती आहे. मात्र एकाही अधिका-यानं या झोपडपट्टीला भेट दिली नाही. संजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की त्यांनी झोपडपट्टीला भेट देऊन मुलभूत कामं करण्यास प्राधान्य दिल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: