परिवहन सेवेच्या दीडशे बसेस भाडेतत्वावर चालवायला देण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन सेवेमधील दीडशे बसेस खाजगी ठेकेदाराला ठेक्यावर देऊन भ्रष्टाचार करणा-या शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं वागळे आगार बस डेपोसमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळी राष्ट्रवादीनं भ्रष्टाचारी ठामपा अन् शिवसेना असे लिहिलेली बस आणली होती. परिवहन सेवेमध्ये खाजगीकरण आणून कामगारांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिवहनचा विकास करण्याच्या नावाखाली शिवसेनेच्या एका उभरत्या नेत्यानं ३ महिने धावपळ केली त्याबदल्यात शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला आठ दिवसापूर्वी २० कोटी रूपयांची बिदागी मिळाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. ठाणे परिवहन सेवेच्या नादुरूस्त असलेल्या दिडशे बस दुरूस्त करून त्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर चालवण्यासाठी कंत्राटदाराला ५ वर्षात ४५७ कोटी रूपये मोजण्याची तयारी पालिकेनं केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेनं गोंधळ घालून चर्चेशिवाय असा प्रस्ताव मंजूर केला त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निदर्शनं केली. यावेळी आंदोलकांनी २५ वर्षात केलं काय, पैसे खाल्ले दुसरं काय, चोर है चोर है शिवसेना चोर है, खाजगीकरण थांबवा कामगारांना वाचवा अशा घोषणा दिल्या. परिवहन सेवेच्या १९० बसेसच्या संचलनासाठी वातानुकुलित बस करता प्रति किलोमीटर ६६ रूपये तर साध्या बस करिता ५३ रूपये कंत्राटदाराला मोजले जात असताना नादुरूस्त असलेल्या दीडशे बसेस दुरूस्त करून त्या जीसीसी तत्वावर चालवण्यासाठी वातानुकुलित बस करिता ८६.२५ पैसे तर साध्या बससाठी ७७.५५ पैसे मोजण्याचा घाट महापालिकेनं घातला आहे. परिवहन सेवा स्वत:च्या हिंमतीवर ज्या बस चालवते त्याचा खर्च प्रति किलोमीटर ११७ रूपये असल्याचं दाखवून जीसीसी पध्दत फायद्याची असल्याचे आकड्यांचे खेळ पालिकेनं केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना देशोधडीला लावण्याचा सत्ताधारी आणि प्रशासनाचा डाव आहे. हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी प्रशासकीय लढाई लढू असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: