निळजे खाडी किनारा सुशोभित केला जाणार

निळजे खाडी किनारा सुशोभित केला जाणार आहे. यासाठी लागणा-या जवळपास ५ कोटी रूपयांच्या निधीला मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. ठाणे आणि कल्याणला जोडणारी देसाई खाडी विकसित करण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी पाठपुरावा केला होता. एकेकाळी निळजे, देसाई, घेसर, खिडकाळी, सांगर्ली या गावातून मोठ्या प्रमाणावर खाडीतून मासेमारी केली जात असे. परंतु नंतर झालेल्या विकासामध्ये सांडपाणी खाडीत सोडण्यात आल्यामुळं देसाई खाडी प्रदूषित झाली. या खाडीतील मासेही कमी झाले. परिणामी देसाई खाडीतील मासेमारी बंद पडली. देसाई खाडी ही निळजे आणि देसाई गावांना जोडणारी असून ती पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते. या खाडीचं वैशिष्ट्यं म्हणजे जून ते सप्टेंबर या खाडीत गोड पाणी तर ऑक्टोबर ते मे दरम्यान या खाडीत खारे पाणी असते. या खाडीमध्ये पूर्वी कोलंबी, जिताड, खेकडे, खरबी, शिंगारी, बोईस आणि ओरसी याप्रकारचे मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असत. या खाडीच्या सुशोभिकरणासाठी मेरिटाईम बोर्डानं ४ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निळजे खाडी किनारी जेटीचे बांधकाम, भरती आणि पुराचं पाणी थांबवण्यासाठी संरक्षक भिंत, पदपथ तसंच खाडी किनारा सुशोभिकरण अशा प्रकारची कामं होणार आहेत. खाडी सुशोभिकरणामुळं या परिसरातील नागरिकांना तसंच ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र मिळणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: