थीम पार्क प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी

घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीमपार्क प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. थीमपार्कच्या कामासाठी अडीच कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असताना या कामासाठी १६ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. ठाणेकरांच्या सार्वजनिक संपत्तीचा हा अपहार आहे. सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते संबंधित ठेकेदाराबरोबर फिरताना दिसत असून यावरून या घोटाळ्यात शिवसेनेचा सहभाग नाकारता येत नाही. तसंच यासाठी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये शिवसेनेचेही सदस्य असल्यानं समितीकडून निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळं या प्रकरणाची समांतर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या थीमपार्क साठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना सल्लागार म्हणून नेमण्यात आलं होतं. नंतर त्यांच्याच कंपनीला हे काम बहाल करण्यात आलं. निविदेतील अटीनुसार काम झालं नसतानाही पालिकेनं १६ कोटी पैकी १३ कोटी रक्कम अदा केली. या थीम पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूसाठी अवाच्या सवा दर आकारण्यात आले आहेत. या सर्व कामाचा खर्च अडीच कोटी रूपयांपेक्षा अधिक नसताना १३ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत. एकूणच या पार्कच्या उभारणीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागारापासून निविदा ठेका देण्यापर्यंतच्या सर्वच प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा ठेवता येत नाही. म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं याप्रकरणी समांतर चौकशी करावी अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: