थीम पार्क घोटाळ्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी पत्र देण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाण्यातील थीम पार्क घोटाळ्याच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रितसर पत्र द्यावं अन्यथा आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. थीम पार्कमधील घोटाळ्याच्या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशीच्या समितीच्या बैठका सुरू असून त्यामध्ये उघडकीस आलेल्या अनेक बाबींचा पर्दाफाश यावेळी करण्यात आला. थीम पार्कचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला त्यावेळी त्याला अनेक सदस्यांनी विरोध केला होता. या प्रकल्पाला स्थायी समितीमध्ये आयत्यावेळचा विषय म्हणून मंजुरी मिळवण्यात आली. निविदा मागवल्या असताना आलेल्या तीन निविदांपैकी २ कंपन्यांचे संचालक एकच होते. त्यानंतरही फेर निविदा न मागवता विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी साडे पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली. निविदेतील अटींनुसार काम पूर्ण झालं नसतानाही ठेकेदाराला पैसे अदा करण्यात आले. सत्ताधारी शिवसेनेच्या काही पुढा-यांना तसंच अधिका-यांना अर्थपूर्ण लाभ देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करूनही आयुक्तांनी पत्र दिल्यासच चौकशी करू असं लाचलुचपत विभागाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळं आता आयुक्तांनी याप्रकरणी पत्र द्यावं अन्यथा आयुक्तही भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा समज होईल असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading