डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटींची वसुली करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबवण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. महापालिका अधिका-यांच्या आढावा बैठकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतानाच डिसेंबर अखेर वसुली इष्टांकाच्या ८४ टक्के म्हणजे जवळपास ५०० कोटी रूपये वसुली करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले. आत्तापर्यंत ३०२ कोटी रूपये मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. ही वसुली निर्धारीत इष्टांकाच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त झाली आहे. जवळपास पावणे पाच लाख मालमत्ता कराची देयकं वितरित करण्यात आली असून त्यापैकी जवळपास अडीच लाखाहून अधिक मालमत्ता धारकांनी आपला मालमत्ता कर भरला आहे. उर्वरित लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबवण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे गटनिहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य द्यावं त्याचप्रमाणे पहिल्या सहामाही मधील थकबाकीदारांकडील वसुलीही करावी असं पालिका आयुक्तांनी सांगितलं. अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्ता कराची आकारणी २५ डिसेंबर पर्यंत करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरिक्षकांनी सादर करण्याचे आदेश या बैठकीत पालिका आयुक्तांनी दिले. वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्वावरील कर आकारणीची कार्यवाही २५ डिसेंबर अखेर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. पाणीपट्टी वसुलीबाबत डिसेंबर अखेर ८० टक्के वसुली करण्याच्या सूचना देताना जप्ती, पाणी जोडणी खंडीत करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले. थकबाकीदारांसाठी कोणतीही अभय योजना देणार नसल्याचं सांगून अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अभय योजना राबवण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या.

 

Leave a Comment

%d bloggers like this: