ठाण्यामध्ये महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारणार – चार्जिंग करणा-यांना पहिली तीन वर्ष अनुदान

केंद्र शासनाच्या २०३० पर्यंत देशातील सर्व वाहनं ई-वाहनं करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ठाणे शहरात १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. ठाणे महापालिका, महिंद्र ॲण्ड महिंद्र आणि कायनेटिक ग्रीन्स मोबिलीटी यांच्यामध्ये काल एक सामंजस्य करार करण्यात आला. ई-चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित न ठेवता शहरामध्ये इलेक्ट्रीक वाहनं उपलब्ध करून देणं, त्यासाठी अर्थसहाय्य पुरवणं अशा सर्वंकष योजना राबवणारी ठाणे महापालिका ही राज्यातली पहिली महापालिका आहे. या सामंजस्य करारावर महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीच्या वतीनं कन्नन चक्रवर्ती तर कायनेटिक ग्रीन्सच्या वतीनं कार्यकारी संचालक रितेश मंत्री यांनी स्वाक्ष-या केल्या. जानेवारी महिन्यापासून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेत इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रस्ताव मंजूर झाला आहे. या प्रस्तावानुसार पालिकेच्या वतीनं पहिल्या वर्षी ई-चार्जिंगसाठी येणा-या खर्चाच्या ७५ टक्के अनुदान, दुस-या वर्षी खर्चाच्या ५० टक्के तर तिस-या वर्षी २४ टक्के अनुदान नागरिकांना देण्यात येणार आहे. जेणेकरून ई-वाहने धोरणांतर्गत नागरिक ई-वाहने घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा खर्च महिंद्र ॲण्ड महिंद्र तसंच कायनेटिक ग्रीन्स कंपनी करणार आहे. या इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनवर कुठल्याही कंपनीच्या वाहनांना चार्ज करता येणार आहे. भविष्यामध्ये या प्रकल्पाच्या कार्यकक्षा वाढवण्यासाठी महापालिका हद्दीलगत असलेल्या इतर महापालिकांशीही समन्वय साधून इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. या प्रकल्पाची कार्यकक्षा वाढवल्यामुळे महापालिका हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर इलेक्ट्रीक चार्जिंगमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही असंही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: