ठाण्यात वाहतूक शाखेतर्फे ई-चलन प्रणालीचा शुभारंभ

ठाणे वाहतूक पोलीसांनी ई-चलन प्रणालीला सुरूवात केली असून पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांच्या हस्ते या ई-चलन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात एकाच वेळी ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. वाहतूक नियमांचा भंग करणा-यांकडून दंड वसुलीसाठी आता ई-चलनाचा वापर होणार आहे. ई-चलन प्रणालीचं वाहतूक पोलीसांना प्रशिक्षण देण्यात आलं असून ठाण्यामध्ये ई-चलनाची ३०० यंत्रं मिळाली आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा ठाणे पोलीस आयुक्तालयात समावेश होतो. या शहरांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा आहेत. त्यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणा-यांकडून ई-चलनाद्वारे दंड वसुली केली जाणार आहे. आज पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या ई-चलन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. वाहन चालकांकडून दंड वसूल करणं हे काही वाहतूक शाखेचं उद्दिष्ट नसून नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागावी एवढाच यामागचा उद्देश असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं. ई-चलनामुळे आता वाहतुकीला काहीशी अधिक शिस्त लागेल असं दिसत आहे. ई-चलनामुळे दंडाचे पैसे आता क्रेडीट आणि एटीएम कार्डाद्वारे देता येणार आहेत. एखाद्याचा परवाना पोलीसांनी जप्त केला असेल आणि तो नवा परवाना काढण्याचा प्रयत्न करत असेल तर असा प्रयत्न आता अयशस्वी ठरणार आहे. ई-चलन प्रणाली प्रादेशिक परिवहन विभागाच्या सारथी आणि वाहन ह्या ॲपशी जोडण्यात आली आहे. त्यामुळं त्याला नवीन परवाना मिळू शकणार नाही अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली. झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या आणि सीट बेल्ट न लावलेल्या दोन वाहन चालकांवर कारवाई करून या ई-चलन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Comment

%d bloggers like this: