ठाण्यातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता शाई धरण उभारावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भेडसावत आहे. ठाणे महापालिकेला एकही धरण बांधता न आल्यानं शहराला इतरांच्या ओंजळीनं पाणी प्यावं लागत आहे. त्यामुळं शाई धरणाची उभारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शाई धरणासंदर्भात कोणत्याही प्रकारची तरतूदच काय पण त्याचा उल्लेखही नाही. पुढील काळात पाणी टंचाईचं संकट तीव्र होणार आहे. या धरणासाठी तरतूद केली गेली असती तर आगामी काळातील पाणी टंचाईवर मात करणं शक्य झालं असतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेकदा यासंदर्भात मागणीही केली होती. त्यामुळं आता आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे.
