कोकण मराठी साहित्य परिषद आणि आम्ही लेखिका यांच्या संयुक्त विद्यमानं साहित्य सोहळा

कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद आणि आम्ही लेखिका यांच्या संयुक्त विद्यमानं अलिकडेच साहित्य सोहळा संपन्न झाला. मौज प्रकाशनाच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं. भावनाशून्य होत जाणा-या समाजाला पाझर फोडण्याचं काम लेखिकाच करू शकतात आणि त्यासाठी लेखिकेला एकत्र येण्याची गरज असल्याचं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा मेघना साने यांनी सांगितलं. आज चहूबाजूंनी माध्यमांचा मारा होत असताना प्रत्येक लेखिकेनं, कवयित्रीनं आपली ओळख टिकवून ठेवणं गरजेचं आहे. या माध्यमात रमून किंवा हरवून न जाता त्याचा वापर जपूनच केला पाहिजे असं मोनिका गजेंद्रगडकर यांनी सांगितलं. महिलांच्या सर्व क्षेत्रातील होत असलेल्या उपेक्षेतून प्रेरणा मिळाली असून त्याद्वारे लेखिका आणि कवयित्रींना राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचं स्वप्न साकार होणार असल्याचं आम्ही लेखिका या संस्थेचे संस्थापक मोहन कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितांचं रसदार सादरीकरण करण्यात आलं. कुसुमाग्रजांच्या लेखनातील विविधता या साहित्य मेळाव्यात त्यांच्या वीज म्हणाली धरतीला या नाटकातील करारी झाशीच्या राणीचा प्रवेश प्राची गडकरींनी सादर केला. चैत्राली जोगळेकर या अभिनेत्रीनं अरूणा शानभागची अतिशय विदारक व्यथा सादर करून प्रेक्षकांना हळवं केलं. ज्येष्ठ कथाकार माधवी घारपुरे यांनी कथा कशी सादर करावी याचा उत्कृष्ट नमुना सादर करत मौलिक मार्गदर्शन केलं. लेखिका मेघना साने यांनी फोटो सेशन आणि भारती मेहता यांनी अदृश्य सोबत या कथा सादर केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading