ठाण्यातील एका महिलेला तिच्या ऑनलाईन मित्रानं ७ लाखांचा गंडा घातला आहे. ठाण्यातील एका सल्लागार संस्थेमध्ये काम करणा-या या महिलेची स्थळं शोधणा-या संकेतस्थळावरून लंडनमधील एका व्यक्तीशी मैत्री झाली होती. ही महिला घटस्फोटीता होती आणि आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. काही महिन्यांपूर्वीच या दोघांची मैत्री झाली होती. लंडनमधील तिच्या या मित्रानं आपलं नाव डोनाल्ड विल्यम् असं सांगितलं होतं. मैत्रीच्या काही दिवसांनंतर विल्यमनं या महिलेला आपण एक भेटवस्तू पाठवली असून ती कुरिअरकडून सोडवून घ्यावी असं कळवलं होतं. १७ जून ते ९ ऑगस्ट दरम्यान विल्यमनं तिच्याकडून अनेक कारणं सांगून जवळपास ७ लाख ३० हजार रूपये उकळले होते. नंतर एकदा तर आपण दिल्लीत आलो असून काही कारणानं भेटू शकत नसल्याचं सांगितलं. बरेच दिवस झाले तरी भेटवस्तू काही या महिलेला मिळाली नाही आणि विल्यमनेही या महिलेशी संपर्क साधणं बंद केलं त्यावेळी या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या महिलेनं पोलीसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलीसांनी विल्यम आणि दिल्लीतील २ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
