ठाणे परिवहन सेवेतील जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात दाद मागणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ठाणे परिवहन सेवेनं सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा असून ठेकेदाराची तूट भरून काढण्यासाठीच दरवाढीचा फंडा पुढे करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईतही याच पध्दतीनं कंत्राट देण्यात आलं आहे. नवी मुंबईत व्होल्व्होच्या एसी गाड्या चालवण्यासाठी पालिका ठेकेदाराला ५९ रूपये देत असताना ठाणे परिवहन सेवा मात्र विनावातानुकुलित बसेस चालवण्यासाठी ठेकेदाराला ६६ रूपये प्रति किलोमीटर देत आहे. त्यामुळं या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेस दुरूस्त करून त्या खाजगी ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे जीसीसीच्या १७५ बसेसच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचं उत्पन्न मिळत आहे. तर परिवहनच्या ताफ्यात १२० बसेसच्या माध्यमातून १४ लाखांचं उत्पन्न मिळत आहे. त्यामुळं परिवहन सेवेच्या बसेस चालवल्या तरी परिवहन सेवेचाच फायदा होणार असल्याचं मत नगरसेवक नजीब मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केलं. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचं उत्पन्न मिळत असलं तरी दुरूस्तीचा खर्च २३ लाख आहे. त्यामुळं दिवसाला परिवहनचं ८ लाखांचं नुकसान होत असतानाही केवळ गोल्डन ठेकेदार आणि प्रशासनामध्ये असलेल्या लागेबांध्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोपही नजीब मुल्ला यांनी केला.
