ठाणे जनता सहकारी बँकेची डॉ. तांबेंच्या नावानं २ लाखांची फसवणूक

ठाणे जनता सहकारी बँकेची एका अज्ञात व्यक्तीनं २ लाखांची फसवणूक केली आहे. गेल्या सोमवारी ठाणे जनता सहकारी बँकेच्या नौपाडा शाखेत डॉ. तांबे हॉस्पीटलमधून एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणा-या महिलेनं आपण तांबे हॉस्पीटलमधून बोलत असून आपल्याला २ लाख रूपये फिक्स डिपॉझिट ठेवायचे आहेत आणि २ लाखांचे सुट्टे पैसे हवे आहेत असं सांगितलं. थोड्याच वेळात मी माणूस पाठवते असंही तिने सांगितलं. मात्र काही वेळानं पुन्हा तिनं फोन करून आपला माणूस काही महत्वाच्या कामासाठी गेला असल्यामुळे आत्ता आपल्याकडे कोणीही माणूस नाही तर आपण सुट्टे २ लाख रूपये पाठवा आणि आम्ही आपल्याला ४ लाख रूपये देतो असं सांगितलं. डॉ. तांबे हॉस्पीटल हे ठाणे जनता सहकारी बँकेचे जुने ग्राहक असून त्यांची बचत आणि व्यावसायिक खाती बँकेत आहेत. त्यामुळे बँकेनं आपल्या कर्मचा-याला सुट्टे २ लाख रूपये घेऊन पाठवले. सुट्टे पैसे घेऊन हा कर्मचारी तांबे हॉस्पीटलमध्ये जात असतानाच घाईघाईनं एक व्यक्ती आली आणि तिनं आपण तांबे हॉस्पीटलचे पीआरओ असून मॅडमनेच आपल्याला पाठवलं आहे. मॅडमच्या केबिनचं काम सुरू असल्यामुळं मॅडम दुस-या केबिनमध्ये बसल्या आहेत. तुम्ही २ लाख रूपये माझ्याकडे द्या मी पैसे मोजून घेतो आणि २ हजारच्या नोटांची २ बंडलं तुम्हांला देतो. तोपर्यंत तुम्ही फिक्स डिपॉझिटच्या फॉर्मवर मॅडमची सही आणा असं या व्यक्तीनं बँकेच्या कर्मचा-यास सांगितलं. बँकेच्या कर्मचा-यानं त्या अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला २ लाख रूपये दिले आणि कर्मचारी तांबे यांच्याकडे गेला आणि त्याने डॉ. तांबेंना सांगितलं की तुम्ही मागवल्याप्रमाणे मी २ लाख रूपये सुट्टे आणले असून तुमचा एक माणूस मला खाली भेटला त्याच्याकडे ते दिले आहेत. मात्र डॉ. तांबे यांनी आपण असे कोणतेच पैसे मागवले नसल्याचं सांगितलं. त्यावेळी कर्मचा-याला बँकेची झालेली फसवणूक लक्षात आली. याप्रकरणी बँकेनं नौपाडा पोलीस ठाण्यात काल तक्रार दाखल केली असून आता पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. यापूर्वीही तांबे डॉक्टरकडून बोलतोय असं सांगून वामन हरी पेठे ज्वेलर्सची अशाच पध्दतीनं फसवणूक करण्यात आली होती.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading