जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणामधील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यानं कमी झाल्यानं नजिकच्या काळात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा, बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये ६३४ दशलक्ष घनमीटर म्हणजे जवळपास ७७ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात ८३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८८ टक्के पाणी साठा होता. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३३ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणामध्ये १९३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८३ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात २१३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९२ टक्के पाणी साठा होता. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला झाला होता. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे धरणामध्ये पाण्याचा साठा काहीसा कमी झाला. त्यातच काही संस्थांनी जादा पाणी उपसा केल्यामुळं पाण्याचा साठा वेगानं खाली आला. हा पाण्याचा साठा जुलै महिन्यापर्यंत पुरावा यादृष्टीनं पाण्याचं नियोजन केलं जात असल्यानं पुढील काही काळामध्ये आणखी पाणी कपातीची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: