ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित झालं आहे. दीड, पाच, सात आणि दहा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान हे ६५ टन निर्माल्य संकलित झालं आहे. यंदा अविघटनशील पदार्थांचं प्रमाण जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाल्यानं शुध्द आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झालं आहे. ठाणे शहराला जल प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी कृत्रिम तलाव आणि निर्माल्याचं शास्त्रशुध्द व्यवस्थापनाचा उपक्रम ठाणे महापालिकेनं समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून सुरू केला होता. सुरूवातीला काहीसा विरोध झालेल्या या प्रकल्पाला आता चांगलंच यश लाभलं असून गणेशोत्सव काळातील निर्माल्य संकलनाला शिस्तबध्दता आणि लोकसहभाग असे दोन्ही आयाम प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या जवळपास ११ विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाचा भाग म्हणून निर्माल्य संकलन केलं जातं. यंदाच्या निर्माल्यात प्लास्टीकच्या पिशव्यांचं प्रमाण ६० टक्के तर थर्माकोलचं प्रमाण १०० टक्के कमी झाल्याचं पहायला मिळालं. ठाणे शहराचा हा निर्माल्य व्यवस्थापन पॅटर्न राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांवरील धार्मिक स्थळी अवलंबिला जाणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच गुड गव्हर्नन्स पुरस्कार मिळाला आहे. वर्षाकाठी जवळपास २ हजार टन निर्माल्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाते. या उपक्रमामुळे तलाव आणि खाडीतील जल प्रदूषणालाही मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे.
