परिवहन सेवेच्या थांब्यावर बसची वाट पाहत बसलेले असताना दोस सलमानी यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वच बस थांब्यांवरील जाहिरातींसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी परिवहन सेवेच्या बस थांब्यावर बसची वाट पाहत असताना दोस सलमानी हे जागीच गतप्राण झाले होते. त्यांच्या शव विच्छेदन अहवालात वीजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. या बस थांब्यावर सोल्यूशन ॲडव्हर्टायझिंग या कंपनीला जाहिराती लावण्याचा ठेका देण्यात आला होता. याप्रकरणी सोल्यूशन ॲडव्हर्टायझिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस याप्रकरणी तपास करत असून नौपाडा पोलीसांनी परिवहन प्रशासनाकडे थांब्यांवरील जाहिरात ठेक्याची माहिती मागितली होती. खोपट मधील या दुर्घटनेनंतर परिवहन सेवा प्रशासन जागं झालं असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्वच बस थांब्यांवरील जाहिरातींसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आले आहेत.
