खासदार राजन विचारेंना भारतीय जनता पक्ष विचारेना

भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ठाणे लोकसभेची जागा गुणवत्तेवर भारतीय जनता पक्षाला द्यावी अशी मागणी केली आहे. भारतीय जनता पक्ष नगरसेवकांच्या या मागणीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीमध्ये सर्वच काही ठिक नसल्याचा संदेश गेला आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये युतीवरून बरेच वाद झाल्यानंतर अखेर युतीवर शिक्कामोर्तब झालं. नेत्यांची युती कार्यकर्त्यांना मात्र फारशी पटली असल्याचं दिसत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ होता. मात्र शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रमोद महाजन यांच्यामार्फत हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला आणि या जागेवर पहिल्यांदाच शिवसेनेतर्फे प्रकाश परांजपे निवडून आले. त्यानंतर गेल्या काही निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. यंदा प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी एकमुखी मागणी करून गुणवत्तेवर या मतदारसंघाची मागणी केली आहे. सध्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षामध्ये फारसं काही योग्य मत नाही. ते भारतीय जनता पक्षाला किंमत देत नाहीत. त्यातूनच ही नाराजी पुढे आली असल्याचं बोललं जात असून हा एक दबावतंत्राचाही भाग असू शकतो. मोदी लाटेमध्ये राजन विचारे निवडून आले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचा विरोध पाहता पुन्हा ते निवडून येऊ शकतील का याबाबत राजकीय अभ्यासकांमध्ये संभ्रम आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा आणि युतीमध्ये अगदी अपरिहार्य ठरलं तर या मतदारसंघातून राजन विचारे यांच्याऐवजी अन्य कोणाला उमेदवारी द्यावी, त्यांच्यासाठी आम्ही काम करू, मात्र विचारेंचे काम करणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी दिला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: