खारटन येथील बीएसयुपी योजनेअंतर्गत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची रहिवाशांची मागणी

एकीकडे बीएसयुपी योजना बंद करण्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली असतानाच या बीएसयुपी योजनेतील घोटाळे समोर येत आहेत. ठाणे महापालिका बीएसयुपी योजनेअंतर्गत खारटन रोड येथे बांधण्यात आलेल्या साईराम हौसिंग सोसायटीच्या योजनेत भ्रष्टाचार झाला असून पात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळावा अशी मागणी येथील रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे केली आहे. ठाणे महाविद्यालयाच्या समोर बीएसयुपी योजनेअंतर्गत ही योजना २००८ मध्ये सुरू करण्यात आली. याबाबत ठाणे महापालिकेनं झोपडपट्टी धारकांची एकदाही बैठक घेतली नाही. ही योजना राबवली जात असलेल्या भूखंडावर धर्मवीर मेहरोल यांनी सोसायटी स्थापन केली पण त्यांनीही झोपडपट्टी धारकांची बैठक घेतली नाही. यातील अनेक झोपडपट्टी धारक अशिक्षित असून त्यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. येथील झोपडपट्टी धारकांचं बाजूच्याच जागेत पुनर्वसन करण्यात आलं असून त्यामध्ये कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी धर्मवीर मेहरोल यांचीही झोपडी होती. आता बीएसयुपी योजनेतून या ठिकाणी ३ इमारती झाल्या असून लवकरच याचं वाटप होणार आहे. याच मेहरोल यांनी बाहेरील लोकांची नावं झोपडपट्टी धारक दाखवून घुसवली असल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यांची एकच झोपडी असताना त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर १४ झोपड्या असल्याचं दाखवून तितक्या सदनिका मिळवल्या आहेत. या ठिकाणी मेहरोल हे पार्किंगच्या नावाखाली महिन्याला हजारो रूपये कमवत आहेत. या बीएसयुपी योजनेत मोठा घोटाळा झाला असून धर्मवीर मेहरोल यांची सखोल चौकशी करून योग्य आणि पात्र झोपडपट्टी धारकाला घर मिळावं अशी मागणी येथील रहिवाशांनी केली असून या प्रकरणी सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत घराचं वाटप करू नये अशी मागणीही या रहिवाशांनी केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: