ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर घुसखोरी करणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली आहे. गोमा पाटील असे त्या संशयिताचे नाव असून कोलशेत येथील नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीला लटकलेल्या अवस्थेत नौदल शिपायाला आढळला. याप्रकरणी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा गुन्हा नौदल विभागाने कापुरबावडी पोलिसात दाखल केला असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. ठाण्यातील कोलशेत येथे भारतीय संरक्षण दलाचे हवाई आणि नौदल तळ आहेत. या क्षेत्रालगतचा परिसर सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र असून याठिकाणी 24 तास देखरेख सुरु असते. शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास नौदलाच्या एन्ट्री पोस्ट नंबर 7 जवळील भिंतीवरून निळी बनियन आणि काळ्या रंगाची विजार परिधान केलेली एक व्यक्ती संशयास्पदरित्या उतरत असल्याचे पाहून नौदल शिपाई एफ. उदितकुमार यांनी त्याला पकडून नौदल अधिकारी प्रियम शर्मा यांच्या हवाली केले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने शेतकरी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दोन रुपयाचे नाणे आणि इतर काही वस्तू सापडल्या असून त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
