कुटुंबियांना बसायला जागा न मिळाल्यामुळं ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे प्रिमियर मधून पडले बाहेर

ठाकरे चित्रपटाच्या प्रिमियरला दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना बसायला जागा मिळाली नाही म्हणून संतप्त झालेले अभिजित पानसे प्रिमियर सोडून बाहेर पडले. ठाकरे चित्रपटाची निर्मिती सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे तर या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलं आहे. अभिजित पानसे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत. पण पानसे आणि राऊत यांची मैत्री जुनी आहे. संजय राऊत निर्माण करत असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित पानसे करत असल्याचं वृत्त आल्यावरच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या पूर्व प्रसिध्दीसाठी झालेल्या अनेक कार्यक्रमात अभिजित पानसे काहीसे मागे पडल्याचंच दिसत होते. एका मुलाखतीत संजय राऊत यांनीही अभिजित पानसे यांना दिग्दर्शन देण्यामागे चित्रपट आपल्याला हवा तसा करता यावा हा उद्देश असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी मुलाखतकर्त्यानं म्हणजे तुमच्या ऐकण्यात असावा असा का ? असा प्रश्न केला असता संजय राऊत यांनी अर्थातच असं उत्तर दिलं होतं. तेव्हाच ही बाब अनेकांना खटकली होती. एकप्रकारे त्याचं प्रत्यंतर चित्रपटाच्या प्रिमियरला पहायला मिळालं. साधारणपणे चित्रपटाच्या नायक-नायिकेनंतर प्रसिध्दीमध्ये दिग्दर्शकाला महत्व असतं पण ठाकरे चित्रपटाच्या बाबतीत मात्र संजय राऊतच सगळीकडे दिसत होते. चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस अभिजित पानसे यांना उशीर झाला. त्यामुळं त्यांच्यासाठी एकच जागा ठेवण्यात आली होती. हे पाहून आपल्या कुटुंबियांसाठी जागा नसल्यामुळे संतप्त झालेल्या अभिजित पानसे यांनी प्रिमियर सोडून बाहेर पडणं पसंत केलं. त्यावेळी संजय राऊत यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अभिजित पानसे यांनी दाद दिली नाही.

Leave a Comment

%d bloggers like this: