कळवा, मुंब्रा, दिव्यातील वीज खाजगीकरणास आमदार जितेंद्र आव्हाडांचा विरोध

कळवा, मुंब्रा, दिवा आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजेच्या खाजगीकरणाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला असून कळवा, मुंब्रा, दिवा पंचक्रोशीमध्ये खाजगी वीज कंपन्यांना पाऊलही ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कळवा, मुंब्रा, दिवा पंचक्रोशीतील वीजेचं खाजगीकरण होणार आहे. भिवंडीच्या धर्तीवर कळवा, मुंब्रा परिसरात वीज वितरण आणि वीज बील वसुलीसाठी खाजगी कंपनी नेमली जाणार आहे. या निर्णयाला आमदार आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. मुंबईमध्ये अदानीला आणि भिवंडीमध्ये टोरंट कंपनीला कंत्राट देण्यात आल्यानंतर तेथील वीज बीलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नौपाडा वगळता सर्वच ठिकाणी रोज वीज गायब होत आहे. वीजेचे दर बदलत नसले तरी नवीन मीटरमुळे रिडींग वाढले आहे. महावितरणला तोटा होत असल्याचं कारण सांगून जर खाजगीकरण लादलं जात असेल तर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर नियंत्रण प्रस्थापित करावं आणि कुठून वीज चोरी होते हे पहावं आणि वीज चोरी करणा-यांवर कडक कारवाई करावी पण गोरगरिबांना नाहक भुर्दंड बसवला जाणार असेल तर खाजगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला. सरकारनं पोलीसी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील यासाठी १५ दिवसात लोक अदालतीच्या धर्तीवर जनतेशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घ्यावीत असं आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं. हा विषय फक्त कळवा, मुंब्रासाठी नसून शहरातही अशाच पध्दतीनं वाढीव बीलं येत असून त्याविरोधातही आंदोलन करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: