आरोग्य विभागाची खुर्ची अचानक तुटल्यानं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बचावले थोडक्यात

पालघरमध्ये आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्य सुविधांची कशी वानवा आहे याचा अनोखा अनुभव आला. एकनाथ शिंदे हे ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची अचानक तुटल्यामुळे शिंदे यांचा तोल गेला. सुदैवानं आजूबाजूच्या मंडळींनी त्यांना सावरल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन बरंच वाढल्याची चर्चा असून दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी जव्हार तालुक्याला अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. हा आढावा घेत असतानाच त्यांची खुर्ची तुटल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खुर्चीवरून पडत असतानाच त्यांना इतरांनी सावरल्यामुळे एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची वास्तव परिस्थिती लक्षात आली. ज्या आरोग्य केंद्रामध्ये खुर्चीची ही अवस्था असेल तर इतर सोयीसुविधांविषयी काय बोलणार अशी परिस्थितीच त्यांना यातून अनुभवायला मिळाली. जव्हार तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या दाभेरी आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. त्यावेळी आरोग्य विषयक समस्या आणि तेथील गैरसुविधा त्यांच्या लक्षात आल्या. आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही, सिस्टर नाही, रूग्णवाहिका नाही अशी परिस्थिती पाहून या दुर्गम भागाच्या समस्या तातडीनं सोडवल्या जातील तसंच आरोग्य विभागातील रिक्त पदं भरली जातील असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साखरेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आरोग्य मंत्र्यांचा हा दौरा गोपनीय असल्यामुळे कोणालाच याविषयी माहिती नव्हती. त्यामुळं आरोग्य विषयक अनेक समस्या, आरोग्य केंद्रांची परिस्थिती त्यांना अनुभवायला आणि पहायला मिळाली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: