असंघटित क्षेत्रातील कामगारांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा समाधानानं जगता यावं यासाठी कोणावर विसंबून न राहता स्वत:च्या हक्काच्या उत्पन्नाचा लाभ घेता यावा यासाठी भविष्य निर्वाह निधीअंतर्गत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या शुभारंभालाच देशात महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक पटकावला आहे. ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात ४० लाभार्थींना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. राज्यात २ लाख ८६ हजाराहून अधिक तर जिल्ह्यात जवळपास ५ हजार कर्मचा-यांनी याचा लाभ घेतला आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रिक्षा चालक, बांधकाम मजूर यांचा समावेश असल्याचं ठाण्याचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त यु. के. शोदे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारीला श्रमयोगी मानधन योजना घोषित केली. या योजनेत ५५ रूपये स्वत:चे आणि ५५ रूपये केंद्राचे याप्रमाणे ४० वयाच्या व्यक्तीसाठी २०० रूपये संबंधित कामगाराचे आणि तितकाच केंद्राचा निधी याप्रमाणे महिन्याला ३ हजार रूपये पेन्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळं ६० वर्ष वयाच्या व्यक्तीस भविष्यात कोणावर विसंबून न राहता त्याचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटणार असल्याचं मत केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केलं.
