अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी मैदान येथे उर्जा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचा सहभाग दर्शवत महिलांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीकोनातून अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रयत्न करण्यात येतो. स्त्री शक्तीच्या क्षमतांचे एक उत्तम प्रतीक असलेल्या उर्जा महोत्सवात महिला विषयक सांस्कृतिक तसंच अन्य कलात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील महिला लघु उद्योजकांना हक्काची सुलभ बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनामध्ये महिला उद्योजकांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच तिन्ही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं अरविंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी सांगितलं.
