अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला अटक

अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे. अब्दुल आपल्या कॉलसेंटरमधून अमेरिकेतील २ फार्मा कंपनीना सेवा देत होता. अब्दुलच्या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत प्रश्न विचारणारे फोन केले जात होते. कोणाला पाठदुखी, गुडघेदुखी किंवा आणखी काही आरोग्य विषयक प्रश्न आहेत याची चौकशी केली जात होती. व्हीओआयपीच्या माध्यमातून हे कॉलसेंटर चालवलं जात होतं. चौधरीला अमेरिकन नागरिकांची माहिती तो एका कंपनीत काम करत असताना मिळाली होती. त्याच्याबरोबर ३ कर्मचारी काम करत होते. एका छोट्याशा खोलीतून हे लोकं अमेरिकेत फोन लावत असत. त्याच्याबरोबर काम करणा-या व्यक्तींना हे अनधिकृत असल्याचं माहित नव्हतं. पोलीसांनी या कॉलसेंटरवर छापा टाकून कॉम्प्युटर, रोकड, टेलिफोन्स आणि लॅपटॉप हस्तगत केले आहेत. चौधरीकडे काम करणा-या कर्मचा-यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं तर चौधरीविरोधात भारतीय टेलिग्राफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: