अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात

अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील १८४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. हे शिक्षक मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू, सिंधी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या माध्यमातील होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांनी नवी मुंबई ८५, कल्याण-डोंबिवली १२, भिवंडी २९, मीरा-भाईंदर १७ तर उल्हासनगर ३७ असे एकूण १८० शिक्षकांचे समायोजन केले होते. यापैकी ६० शिक्षकांचे अध्यापनाचे माध्यम बदलून हिंदी माध्यमातील रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले होते. या १८० शिक्षकांपैकी फक्त नवी मुंबई महापालिकेनं मराठी माध्यमातील २६ आणि हिंदी माध्यमातील ५ अशा एकूण ३१ शिक्षकांना हजर करून घेतले. तर उर्वरीत १४९ शिक्षकांना कुठल्याच महापालिकेनं हजर करून न घेतल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर या शिक्षकांचे पगार बंद झाले. या शिक्षकांचा तिढा सुटावा यासाठी पालकमंत्री तसंच आमदार निरंजन डावखरेंना निवेदन देण्यात आलं आहे. हा प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं डावखरे यांनी सांगितल्याचं शिक्षक सेना ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी म्हटलं आहे. या शिक्षकांना तातडीनं हजर करून त्यांच्या थकीत वेतनासह पुढील वेतन नियमित सुरू करावं अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment