ठाणे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणा-या ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र मेट्रोला सहाय्यभूत ठरणारा अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी ठाणे महापालिकेनं प्रस्ताव तयार केला होता. महापालिका आयुक्तांनी मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोच्या सल्लागारांबरोबर सातत्यानं बैठक घेऊन अंतर्गत मेट्रोच्या मार्गिका निश्चित केल्या होत्या. शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प एकूण ५ टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिला आणि पाचवा टप्पा एकत्रितपणे राबवण्यात येणार असून एकूण १०३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा पहिला आणि पाचवा टप्पा मिळून ३४ किलोमीटर लांबीचा मार्ग बांधण्यात येणार आहे आणि या मार्गात ६० स्थानकं आहेत. अंतर्गत मेट्रो मार्गिका विकसित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी गेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणारआहे.
