गंधार कला संस्था आणि विद्याताई पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गायनाची आवड असणा-यांसाठी ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत गायन कसे असावे, गाण्याचा सराव कसा करावा, गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा, गाण्याचे तंत्र, गाण्यामागची भावना, सूर-ताल यांचे गाण्यातील बारकावे या आणि अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन अशोक पत्की स्वत: करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत गंधार कला संस्थेच्या मंदार टिल्लू यांनी ही माहिती दिली. गंधार कला संस्थेतर्फे यंदाही युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विजू माने, अभिजित चव्हाण आणि निरंजन कुलकर्णी यांना युवा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे तर संगीत कार्यशाळेतून जमा होणारा निधी हा बाल रंगभूमीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणा-या विद्याताई पटवर्धन यांच्या औषधोपचारासाठी मदत म्हणून देण्यात येणार असल्याचं मंदार टिल्लू यांनी सांगितलं.