भारतीयांच्या मनात भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली. केंद्रीय दक्षता आयोग हा शासन प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी अग्रेसर असून दरवर्षी या अनुषंगाने २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान जनजागृती मोहिम राबवली जाते. या मोहिमेच्या निमित्तानं आज ही शपथ देण्यात आली. या मोहिमेदरम्यान जनजागृती करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी मोहिम आखण्यात आली आहे. याबरोबरच प्रमुख कार्यालयांमध्ये बैठका घेऊन लाचखोरी संदर्भात कार्यवाहीची आणि कायद्यातील तरतुदीची व्यापक माहिती दिली जाणार आहे. लाचेसंदर्भातील तक्रारीसाठी १०६४ या क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
