दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचं चित्र दिसत होतं. दिवाळीची खरेदी करण्यासाठी काल ठाणेकर बाहेर पडल्यामुळं रस्त्यांवर गर्दी दिसत होती. अगदी रात्री उशिरापर्यंत या गर्दीचा अनुभव येत होता. काही ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या मंडळींमुळं वाहतूक कोंडीचाही अनुभव येत होता. दिवाळी हा दिव्यांचा सण असून सर्वत्रच आनंदाचं, चैतन्याचं वातावरण दिसू लागलं आहे. ठाण्याच्या बाजारात सध्या सगळीकडे दिवाळीसाठी आकाशकंदिल, रांगोळ्या, पणत्या, फटाके आणि खासकरून कपड्यांची दुकानं सजली आहेत आणि ग्राहकही या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसत आहे. ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर तर दुपारपासूनच गर्दी होत असल्यामुळं वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. निरनिराळ्या आकाराचे लहानमोठे आकाशकंदिल सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. तर सुबक सुंदर पणत्या आणि नानाविध प्रकारचे रांगोळीचे रंग ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सध्या फटाके उडवण्याचा कल कमी दिसत असला तरी बाजारात असलेले विविध प्रकारचे फटाके घेण्यासाठीही गर्दी होत आहे. या सगळ्यांबरोबर दिवाळीत महत्व असतं ते फराळाला. सध्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कामासाठी बाहेर पडत असल्यानं तयार फराळाला मागणी आहे. एखाद-दुसरा पदार्थ घरी करून बाकी फराळ मात्र बाहेरून आणण्याकडे महिला वर्गाचा कल असतो. यामुळं तयार फराळालाही मोठी मागणी असून अशा दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. सर्वसाधारणपणे दुकानं ९ वाजता बंद व्हायला लागतात मात्र सध्या दिवाळीचं वातावरण असल्यामुळं रात्री उशीरापर्यंत दुकानं सुरू राहत असल्याचं दिसत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading