दिवाळीच्या खरेदीची धूम सुरु असल्याने ठाण्यातील अनेक रस्त्यांवर काल आणि आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. तर दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सवलतींमुळे मॉल गजबजले असून मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे देखील शहरात कोंडी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. शहरातील राममारुती रोड, मुख्य बाजारपेठ, जांभळी नाका या परिसरात वाहतुक मंदावली होती. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले रोड, राममारुती रोड आणि जांभळी नाका हे परिसर व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जातात. स्टेशन रोड परिसरातील रस्ते रुंद केले असूनही रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांनी उच्छाद मांडल्याने कोंडीत भर पडली होती. मुख्य म्हणजे वाहतूक कोंडीत भर पडण्यास महत्वाचं कारण हे बेशिस्त वाहन चालक हे होतं. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहनं, त्यातच रस्त्यातच गाड्या उभ्या करून खरेदीचा होणारा प्रयत्न, गाड्या पुढे काढण्यासाठी वाहन चालकांची होणारी घाई यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. राम मारूती रस्त्यावर तर काल रात्री वाहन उभं करण्यावरून जोरदार हातघाई बघायला मिळाली. रस्त्यात गाडी उभी केल्यामुळे हवा काढण्यावरून झालेल्या वादाची परिणिती ही जोरदार हाणामारीत झालेली पहायला मिळाली.
