वाहतुकीचे नियमभंग करणा-यांविरूध्द वाहतूक शाखेनं राबवलेल्या मोहिमेत १ हजार ८६ वाहनचालकांवर कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं होळी-धुळवडीनिमित्त वाहतुकीचे नियम भंग करणा-यांविरूध्द एकूण १ हजार ८६ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. ठाणे वाहतूक शाखेतर्फे दरवर्षी होळी-धुळवडीपूर्वी मद्यप्राशन तसंच वाहतुकीचे नियम भंग करून वाहन चालवणा-यांविरूध्द मोहिम छेडली जाते. यावर्षीही नाक्यानाक्यांवर अशी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ९४ वाहन चालकांविरूध्द ठाण्यात कारवाई करण्यात आली तर भिवंडी १७, कल्याण १८ आणि उल्हासनगरमध्ये १६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ प्रमाणे ८० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणा-यांवर ठाण्यात २८, भिवंडीत २४, कल्याणमध्ये ८७ तर उल्हासनगरमध्ये १५८ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट ठाणे ३२८, भिवंडी ८७, कल्याण ७ तर उल्हासनगर २५ अशा एकूण ५३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडणे ११ तर सिग्नल तोडणा-या २० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळं श्वास विश्लेषकांचा वापर करण्यात आला नाही पण मद्यप्राशन करणा-या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करत होते. वाहतूक नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, सीटबेल्ट लावा, मद्यपान करत गाडी चालवू नका असा संदेश देत वाहनधारकांच्या गाड्या थांबवून वाहतूक पोलीस वाहन चालकांना रंग लावत होळी साजरी करत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading