Social

दिव्यांग कला केंद्राच्या गणेश विसर्जनातून साकारणार बाप्पाचं झाड

दिव्यांग कला केंद्र म्हणजे सिंड्रेला या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ठाण्यातील अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली दिव्यांग मुलांची एक अनोखी शाळा. प्रत्येक दिव्यांग मुलाची आपल्या अंगीभूत कलेतून स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी याकरिता निस्वार्थपणे केलेला यशस्वी प्रयत्न. गेल्या तीन वर्षात या दिव्यांग विद्यार्थ्यांकडून नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कला प्रकारांच्या माध्यमातून आपली कला सादर करून घेतली. दिव्यांग बंधन, दिवाळी पहाट, बालदिन, आषाढीची वारी ते दिव्यांग मुलांनी अभिनय केलेल्या बालनाट्यापर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम अभिनय कट्ट्यावर सादर करण्यात आले. दिव्यांग कला केंद्रामार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. दिव्यांग मुलांच्या माध्यमातून समाजाला एक महत्वपूर्ण संदेश देण्यासाठी लाल मातीच्या कुंडीत गणेश मूर्तींचं आगमन आणि कुंडी विसर्जन सुरू करण्यात आलं. दिव्यांग कला केंद्रात लाल मातीच्या गणेश मूर्तीचे आगमन दिव्यांग मुलांच्या हस्ते झालं. त्यापूर्वी पर्यावरण स्नेही आराससुध्दा या मुलांनी केली होती. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा फलक, सभोवताली विविध रोपांच्या कुंड्या तसंच गणेश मूर्तींची रंगरंगोटी सुध्दा याच मुलांनी नैसर्गिक रंगाच्या साहित्यातून केली होती. गुरूजींच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग मुलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसंच नैवेद्य आणि सर्वच विधी करून भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाला लाल मातीच्या कुंडीमध्ये निरोप देण्यात आला. या गणेश मूर्तींमध्ये तुळशीच्या बिया मूर्ती घडवतानाच पेरण्यात आल्या होत्या. म्हणजे दिव्यांग कला केंद्राच्या या कुंडीमध्ये गणेश विसर्जनातून येत्या काही दिवसात साकारणार आहे बाप्पाचे झाड. हे झाड भविष्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-यांना सन्मानाप्रित्यर्थ देण्यात येईल. आगामी काळात दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून गणेश विसर्जनातून बाप्पाचे हे झाड प्रत्येकाने साकारावं असं आवाहन दिव्यांग कला केंद्र परिवारातर्फे किरण नाकती यांनी केलं आहे.

Comment here