वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, मनोविकास थीम

वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, येत्या शनिवार आणि रविवारी मनोविकास या थीमवर तेरा वस्त्यांमधील कार्यकर्ते कलाकार स्वरचित नाटिका सादर करणार असल्याची माहिती समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ यांनी दिली आहे. वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे लोकवस्तीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी आहे. एक चांगला, वेगळा व जबाबदार नागरिक घडविणे, हे या चळवळीचे ध्येय आहे. शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी व सुंदर दिसण्यासाठी आपण धडपडतो तितकेच महत्व, मनाला सुंदर बनवण्यासाठी धडपडण्याला देणे म्हणजे मनोविकास. म्हणूनच यंदा इन्स्टिट्यूट फाॅर सायकाॅलाॅजिकल हेल्थ अर्थात आयपीएच चे प्रमुख डा. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने मनोविकास ही थीम नाट्यजल्लोष साठी निवडण्यात आली आहे. गेले चार महिने नाट्य, मनोविकास, लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध पैलूंवर डाॅ. आनंद नाडकर्णी, आयपीएचच्या वैदेही भिडे, शुभांगी दातार, संवेदनशील लेखिका, नृत्यांगना आणि नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर आदींच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. १ आणि २ जूनला होणा-या या जल्लोषाच्या वेळी प्रसिद्ध रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात गोदुताई परूळेकर उद्यानात होत असलेल्या या कार्यक्रमाला संवेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या १३ नाटिकांमधून सहा नाटिका पहिल्या फेरीत निवडून त्यांचे सादरीकरण साने गुरूजी स्मृती दिना निमित्त ९ जूनला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading