गोवर रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतात तेथे सर्व्हे करावा आणि विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिले. गोवर रोगासंबंधी उपाययोजनांसंदर्भात आज जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा, महापालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांची तातडीची बैठक आज जिल्हाधिका-यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. गोवर रोगाची सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी घेतली. गोवर रोगाची व्याप्ती वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. संशयित बालकांची तातडीने चाचणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवावे. तसेच ज्या भागात असे रुग्ण आढळले तेथे जास्त लक्ष द्यावे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे साधारणपणे लसीचा भरपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक तेथे लस पोचविण्यासाठी व्यवस्था यंत्रणेने करावी. लसीकरणात कुठलीही कमतरता ठेवू नये. किती बालकांना लस अद्यापपर्यंत दिली नाही, त्याची माहिती अद्ययावत ठेवून त्यांच्यापर्यंत लस पोचेल याची व्यवस्था संबंधित आरोग्य यंत्रणेने करावी. लसीकरणासदंर्भात पालकांची जनजागृती करावी असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. जिल्ह्यात गोवर लसीची कमतरता नाही. जेथे लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी गोवरचे संशयित रुग्ण कमी आढळले आहेत. त्यामुळे लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करावे. गोवर रुग्णांच्या उपचारासाठी भिवंडी येथे वॉर्ड तयार ठेवण्यात आले आहे असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading