घर तिथे शौचालय कामाचा कोपरीत शुभारंभ

गेल्या अनेक वर्षांपासून कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा, साईनगरी मधील शौचालयातील सांडपाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात येथील नागरिकांची शौचालयबाबत सांडपाण्याची डोकेदुखी दूर होणार आहे. “घर तिथे शौचालय” या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी या कामाचा शुभारंभ केला तसेच या परिसरात नवीन पाण्याची लाईन देखील टाकण्यात येणार आहे. या योजनेमुळे कोपरी येथील 2500 घरांना याचा लाभ होणार असल्याचे यावेळी भरत चव्हाण यांनी सांगितले. चेंदणी कोळीवाडा,साईनगरी विभागात ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भासत होती. मागील काही वर्षात माजी नगरसेवकांनी आश्वासन तसेच पाठपुरावा केला होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून ही योजना रखडली होती. दरम्यान विद्यमान नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे ही समस्या स्थानिकांनी मांडली असून तातडीने पाऊले उचलली गेली. या नंतर सर्व्हे करून जमीन लेव्हलचा प्रश्न मार्गी लावून घेतला आणि घरोघरी ड्रेनेज लाईन टाकून दिली जात आहे. त्यामुळे घराघरात शौचालय बांधण्याची सुविधा रहिवाश्यांना उपलब्ध झाल्याने अनेक वर्षाची कुचंबणा थांबली असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असून स्वच्छता अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading