लोकमान्यनगर आता कोविड मुक्तीच्या दिशेने

ठाण्यातील काही महत्वाच्या हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये लोकमान्यनगरचा समावेश होता. पण प्रशासन, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांमुळे मिशन झिरो ही मोहिम लोकमान्य नगरमध्ये यशस्वी होत असून लवकरच लोकमान्य नगरची वाटचाल कोविड मुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी मिशन झिरो ही मोहिम राबविण्यात येत असून लोकमान्य नगर प्रभाग हा कोरोनाच्या जास्त प्रादूर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला होता. येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम आणि निर्मलादेवी चिंतामणी दिघे रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी गेले तीन साडेतीन महिने परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचंड मेहनत घेत आहेत. येथील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक हणमंत जगदाळे आणि दिगंबर ठाकूर, शिवसेना उपविभागप्रमुख महेश लोखंडे, बाळा राठिवडेकर, दीपक परब हे सुद्धा वेळोवेळी नागरिकांच्या मदतीला धावत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी या रुग्णालयात रॅपिड अँटीजन चाचणी केंद्र उभारले असून तीस मिनिटात रुग्णाचा रिपोर्ट मिळत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्स उपलब्ध आहे. यामुळे बाधित रुग्णाला औषोधोपचार मिळण्यास मदत होत असून रुग्ण इतरांना बाधित करण्यापासून दूर राहतो आणि संसर्ग रोखण्यास मदत होते. डॉक्टर्स नर्स आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधींमुळे हे शक्य झाले असून सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे येथील कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading