रंगवल्ली परिवाराने साकारले “रंग रामायण” रांगोळी प्रदर्शन

हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतुन उमटले आहे. कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातुन घडेल.असे प्रतिपादन ठाण्याचे आतंरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले.

श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्रेमध्ये रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे. नौपाडा, विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १९ येथे वेद कट्टी यांच्या रंगवल्ली परिवाराने साकारलेल्या “रंग रामायण” या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार बोधनकर यांच्या हस्ते पार पडले. गुढीपाडव्या निमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे हे नववे वर्ष आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतुन रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचे कौतुक करून चित्रकार बोधनकर यांनी, हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतुन उमटल्याचे सांगितले. कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातुन घडेल. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण भारतात हे जुने वैभव कलेतुन पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. आज कलाकार उदंड झालेत पण, रसिक घटले आहेत. तेव्हा, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलपासुन परावृत्त करणे गरजेचे असल्याचे आवाहन बोधनकर यांनी केले. रंगवल्ली परिवारातील ३० कलाकारांनी रामजन्मापासून श्रीराम राज्याभिषेकापर्यंत रामायणातील विविध प्रसंगावर आधारित २१ रांगोळ्या साकारल्या आहेत. यात रामजन्म, स्वयंवर, वनवास प्रस्थान, शूर्पणखा,सुवर्ण मृगाचा पाठलाग, सीताहरण, जटायु, सेतुबंधन, राम-रावण युद्धप्रसंग अशा श्रीराम जीवन दर्शन घडवणाऱ्या रांगोळ्या असुन १० एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे. त्याचबरोबर, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक प्रित्यर्थ प्रदर्शन देखील येथे भरवण्यात आले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading