यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम आणि मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४-४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायं. ५-४३ वाजता होईल त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकील . पश्चिम आकाशात हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायं. ६-०८ वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किंना-यावरून पाहिल्यास सागरात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण ग्रहण चष्म्यातूनच पहावे. किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. या सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण येत नाही. यावर्षी शुक्रवार २१ अॅाक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी- वसुबारस आहे. शनिवार २२ अॅाक्टोबर रोजी धनत्रयोदशी , धन्वंतरी पूजन आहे.रविवार २३ अॅाक्टोबर रोजी सण नाही. सोमवार २४ अॅाक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मी- कुबेरपूजन आहे. मंगळवार २५ अॅाक्टोबर रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे.बुधवार २६ अॅाक्टोबर रोजी बलिप्रतिपदा, भाऊबीज एकाच दिवशी आले आहेत असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading