ठाण्यातील रिवाज संस्थेतर्फे काॅन्फ्ल्युएन्सचे आयोजन

दोन नद्यांचा किंवा दोन संस्कृतींचा संगम याबद्दल आपणांस ठाऊक असेल पण कलेच्या क्षेत्रात विशेषतः शास्त्रीय संगीत क्षेत्रात दोन सम अथवा विभिन्न रूप असलेल्या सादरीकरणाचा संगम ऐकण्याचा व पाहण्याचा योग क्वचितच येतो. असाच ‘काॅन्फ्ल्युएन्स योग ‘ ठाणेकर रसिकांसाठी ठाण्यातीलच शास्त्रीय संगीत विद्यार्थी असलेल्या मेहूल नायक यांच्या रिवाज़ संस्थेतर्फे येत्या १० जून रोजी गडकरी रंगायतन मध्ये संध्याकाळी ८.३० वाजता जुळून येत आहे. तालवाद्य प्रकारात तबला वादन हे प्रामुख्याने लोकप्रिय आहे. आणि तबला वादन प्रकारात जशी उस्ताद अल्लारखाजींची आणि उस्ताद झाकीरभाईंची पितापुत्रांची ख्याती आहे. त्याच प्रकारे ठाणेकर निवासी असलेले तालमणी पंडित मुकुंदराज देव आणि त्यांचे शिष्योत्तम असलेले चिरंजीव रोहित देव यांची जोडी परिचित आहे. याच पितापुत्रांच्या तबलावादनाची जुगलबंदी काॅन्फ्ल्युएन्स च्या पहिल्या सत्रात ऐकायला मिळणार आहे. पितापुत्रांच्या समशैलीचा तरीही वेगळेपणा जपणारा हा संगम अनुभवणे निश्चितच रोमांचकारी ठरेल. दुसर्‍या सत्रात तंतूवाद्य व्हायोलिन वादन प्रकारात वादक विद्वान डाॅ. म्हैसूर मंजूनाथ यांच्या कर्नाटक शैली वादनाचा संगम हिंदुस्थानी शैली वादनातील विद्वान स्वरप्राज्ञ पंडित मिलिंद रायकर यांच्या बरोबर जुगलबंदीने होणार आहे. हा अनोखा जुगलबंदी संगम अनुभवणे हा संगीतातील समसमा मणिकांचन दुग्धशर्करा योग ठरणार आहे. कोविड नंतरच्या नव्याने उत्साह वर्धक काळात रिवाज़ संस्थेतर्फे शास्त्रीय संगीत विषयक अनेक उपक्रम सातत्याने केले जात आहे. त्यात शास्त्रीय संगीत गायन वादन शिकू इच्छिणार्‍यांसाठी कार्यशाळा, नवकलाकारांचे सादरीकरण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी छोट्या मोठ्या बैठकांचे मैफिलींचे आयोजन, नव्या पीढीला शास्त्रीय संगीताची आवड लागावी यासाठी त्या संकल्पना आधारीत टी शर्ट्स चे वितरण, शास्त्रीय संगीतासाठी विशेष यु ट्यूब चॅनल, इत्यादी अनेक उपक्रमांचे आयोजन रिवाज़ तर्फे केले जात आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी 9930274479 या क्रमांकावर संपर्क साधाव असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading