ठाण्यातील पूलांविषयी श्वेतपत्रिका जारी न केल्यास महामार्ग बंद करण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

ठाण्यातील पूलांच्या अवस्थांबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. येत्या ८ दिवसात अशी श्वेतपत्रिका जारी न केल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. ठाणे-मुंबईला जोडणारा कोपरी पूल धोकादायक झाला आहे. या पूलावर गतीअवरोधक आणि उंची अवरोधक बसवून धोक्याचा इशारा देणारा फलक लावण्याच्या सूचना रेल्वेनं दिल्या आहेत. अशातच नितीन जंक्शन, कॅडबरी पूल धोकादायक झाल्याचा अहवाल मुंबई आयआयटीचे तज्ञ सविक बॅनर्जी आणि आर. एस. जांगिर यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. हा अहवालच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत मांडून शासनाचे वाभाडे काढले. नितीन पूलाचे २०१७ मध्ये परिक्षण करण्यात आले. या पूलाचा अहवाल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर करण्यात आला. या पूलाच्या सर्व गर्डरला बाक आलेलं आहे. या गर्डरला तडेही गेले असून त्याच्या स्लॅबसाठी वापरण्यात आलेलं कॉन्क्रीट सुमार दर्जाचं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुंबईतील पूलाची दुर्घटना अशाच त्रुटीमुळे घडली आहे. त्यामुळं हा पूलही कोसळण्याची दाट शक्यता आहे. जर कोपरीला पूल कोसळला तर रेल्वेमार्गे होणारी उत्तरेकडील वाहतूक ठप्प होईल. नितीन पूल कोसळल्यास अनेकांचे जीव जाण्याबरोबरच नाशिकमार्गे होणारी वाहतूक ठप्प होईल. शरद पवार यांनीही पूलांच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मात्र सत्ताधा-यांना कशाशीच देणंघेणं नाही. कोपरीचा पूल रेल्वेवर कोसळला तर ५ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. याची काही फिकीर सत्ताधा-यांना नाही. त्यामुळं ठाणे महापालिकेनं पूलाच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या आहेत किंवा पूलाचे पुढे काय करणार याबाबत श्वेतपत्रिका काढावी. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं नितीन पूलासाठीही काय उपाययोजना केल्या याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आयआयटीनं आपला अहवाल महामंडळाला म्हणजे या खात्याचा कारभार सांभाळणा-या पालकमंत्र्यांना सादर केला आहे. त्यामुळं एखादी दुर्घटना घडल्यास तेच जबाबदार असतील. त्यामुळं श्वेतपत्रिका काढून ठाणेकर प्रवासी सुरक्षित असल्याचं आश्वस्त करावं अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading