ठाण्यातील इतिहासाचे अभ्यासक आणि व्याख्याते वि. ह. भूमकर यांचं निधन

ठाण्यातील इतिहासाचे अभ्यासक आणि व्याख्याते वि. ह. भूमकर यांचं शनिवारी निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. भूमकर हे गेल्या तीन वर्षापासून आजारी होते. भूमकर हे मूळचे मराठवाड्यातील औरंगाबादचे. भूमकर यांना क्रिकेटची आवड होती. काही कारणामुळे राज्य पातळीवर खेळण्याची संधी हुकली तरी त्यांनी प्रशिक्षक म्हणून आपली आवड जपली होती. त्यांची खरी ओळख ही शिक्षक म्हणूनच झाली. ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी ३६ वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि या शाळेचं मुख्याध्यापक पदही भुषवलं. इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी या विषयात त्यांचा हातखंडा होता. रामदास स्वामी, भारतीय क्रांतीकारक, स्त्री संत, पुरूष संत, अनेक विचारवंत, राष्ट्रपुरूष अशा विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्यानं दिली. व्याख्यानांबरोबरच त्यांनी इतिहास लेखनाचंही काम केलं. घारापूरची अक्षरशिल्पं, भटकंती, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा विविध विषयांवरही त्यांनी पुस्तक लेखन केलं होतं. ठाण्यात झालेल्या धर्म तत्वज्ञान संमेलनाचं त्यांनी दोनवेळा अध्यक्षपद भुषवलं. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सूना, नातवंडं असा परिवार आहे. ठाणे वार्तामध्येही त्यांनी क्रांतीकारकांवर एक व्याख्यान मालिका केली होती. ठाणे वार्ता परिवारातर्फे वि. ह. भूमकर यांना विनम्र आदरांजली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading