यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट आहे परंतु गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होवू नये यासाठी ठाणे महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दिड दिवस साजरा करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सींग आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत जाहीर केले. ठाणे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 38 वे वर्ष आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत आज बैठक घेण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव हा दीड दिवस साजरा करुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या प्रांगणात कृत्रिमरित्या केलेल्या व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारची देणगी स्विकारली जाणार नसून अत्यंत साधेपणाने हा उत्सव करण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ठाणेकरांनी सुध्दा यंदाचा गणेशोत्सव महापालिकेने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करुन साजरा करावा तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.