ठाणे ग्रामीण करोनामुक्त

जिल्हा परिषद क्षेत्रातील करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. ३० मार्च पासून एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने आज ग्रामीण भागात करोना रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. गेल्या दोन वर्षात करोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मार्च २०२० पासून करोना प्रतिबंधक उपायोजनामुळे सर्वत्र निर्बंध घालण्यात आले होते. आज दोन वर्षानंतर ठाणे ग्रामीणमधील करोना बाधितांचा आकडा शून्यावर आला असून ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्याही शून्यावर आली आहे. करोना काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विविध खबरदारीच्या उपाययोजना म्हणून चाचणी, सर्वेक्षण, स्वच्छता, उपचार, लसीकरण, आरोग्य शिक्षणावर भर देण्यात आला. या उपाययोजनाची प्रत्येक्ष अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी, महिला आणि बाल विकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस त्याचबरोबर शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ठाणे ग्रामीणमधील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४९ हजार २०८ रुग्णाची नोंद झाली. यापैकी ४७ हजार ९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर दुर्दैवाने १२५४ रुग्णाचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमधील आतापर्यंत ११ लाख ३५ हजार १३२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९ लाख ४० हजार ७७ जणांचा पहिला तर ६ लाख ७१ हजार ९८ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर ५ हजार ५०८ नागरिकांनी बुस्टर घेतला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करोना विषयक जनजागृती करण्यासाठी माहिती, शिक्षण,संवाद या त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. यासाठी डिजिटल माध्यमांसह पारंपारिक प्रसार आणि प्रचार माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्याचबरोबर प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या संयुक्त प्रयत्नातून नागरिकांना करोना नियंत्रण नियमावलीचे पालन करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यात आले.
करोना काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विविध खबरदारीच्या उपाययोजना म्हणून चाचणी, सर्वेक्षण, स्वच्छता, उपचार, लसीकरण, आरोग्य शिक्षणावर भर देण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणावर माहिती, शिक्षण, संवाद कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. तसेच राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व नियंत्रण नियमावलीचे पालन करण्यात आले. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यास जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading