जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शेतकरी बांधवांसाठी अधिक प्रभावशाली काम करण्याचा संकल्प – रविंद्र चव्हाण

जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी, दळणवळणाच्या सुविधा, शेतकरी बांधवांना विविध योजनांतून मदत, आरोग्य सुविधा यासाठी अधिक प्रभावशाली काम करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमवगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी श्री. चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले.
ठाणे जिल्ह्याचा लोकप्रतिनीधी म्हणून मला अमृत महोत्सवी वर्षांत आज ध्वजवंदनाची संधी मिळाल्याने कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त करून चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी अभिवादन करतो. स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात अनामवीरांचे स्मरण करतानाचा, त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी आणि तरुण पिढीला स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती व्हावी यासाठी देशभऱ अमृत महोत्सव आयोजित केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षांत अजून एक महत्वपूर्ण आणि लक्षणीय गोष्ट घडली आणि ती म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यातून मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या रुपाने राज्याला विकासाची दिशा दाखविणारं नेतृत्व मिळालं आहे, ही आनंदाची बाब आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे. जिल्हाप्रशासन आणि जिल्ह्यातील विविध महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या महोत्सवांतर्गत विविध अभिनव असे उपक्रम सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र वातावरण भारावून गेल आहे. विद्यार्थ्याची प्रभातफेरी, सायकल रॅली, मॅरेथॉन, विविध स्पर्धा यांद्वारे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्सवी स्वरूप पहायला मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्यातील एक महत्वपूर्ण भाग म्हणजे घरोघरी तिरंगा हा उपक्रम. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, संस्था यासोबत नागरिकांनी देखील आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे. नागरिकांना तिरंग्याच्या उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केलेले नियोजन आणि नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. चव्हाण म्हणाले की, वर्षभऱ चालणाऱ्या अशा विविध उपक्रमांमधून स्वातंत्र्यवीरांची गौरवगाथा आपल्या समोर मांडली जाईलच परंतु तरुण पिढीला या स्वातंत्र्य संग्रामाचे, वीरांच्या बलिदानाची महती समजण्यासाठी सर्वांनीच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास धगधगता ठेवला पाहिजे. आपल्या प्राणाची, कुटुबांची तमा न बाळगता अनेक अनामवीर देशाच्या स्वातंत्र लढ्यात शहीद झाले. त्याचे आपण कधीच विस्मरण होऊ देवू नये.

राज्याबरोबरच ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. ठाणे जिल्ह्यातील विविध वाहतूक प्रकल्प, रस्ते यांच्या कामांना गती देण्यासाठी शासन भरीव निधी देईल, असेही त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा कहर काहीसा कमी झाला असला तरी जिल्ह्यात स्वाईन फ्लू ने डोकं वर काढले आहे. आगामी सण उत्सवांच्या काळात कोरोना आणि स्वाईन फ्लू आजाराबाबत सामाजिक भान बाळगण्याची जबाबदारी सर्वांचीच असून विविध संस्था, मंडळांनी याबाबत अधिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थितांशी चव्हाण यांनी संवाद साधला. ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात पोलीस तसेच जिल्हा परिषदेच्या विविध गुणवत्ताप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद,पोलीस विभाग या मधील गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading