जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा 900 खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारती संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके आणि ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेतील विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम जलदगतीने सुरू व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले. उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बांधकाम विभागाचे सचिव एस.एस. साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, महापालिकेचे सहाय्यक नगर नियोजनकार सतीश उईके, अशोक राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading