गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीसंदर्भात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालये आणि महापालिकांकडून सविस्तर माहिती घेतली. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पालकमंत्री देसाई म्हणाले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. मात्र मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मिरवणुका शांततेत आणि सामंजस्याने पार पाडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 18 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, होमगार्ड, स्वयंसेवकही मदतीसाठी आहेत. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे दोन हजार सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन जिल्ह्यात शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकांमुळे पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्या उत्साहात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading