एका विमनस्क तरूणाने केली मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा अर्धा तास ठप्प

कधी पावसामुळे, कधी तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वेळापत्रक कोलमडून चाकरमान्यांची हालअपेष्टा होत असताना काल एका मनोरुग्ण तरुणाने संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास चक्क प्लॅटफॉर्म नं. १ आणि २ च्या मधील उच्च विद्युत दाबाच्या खांबावर चढून “रामगड के शोले” करून रेल्वेला आणि चाकरमान्यांना धक्का दिला. अग्नीशमन दलाने त्याला सुखरूप खाली आणले. मात्र पुन्हा एकदा रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. त्यामुळे स्थानकावर एकच प्रवाशांची गर्दी जमली होती. तब्बल २५ ते ३० मिनिटे धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती स्टेशन मास्तर आर के मीना यांनी दिली. रामगड के शोले चा नायक मनोरुग्ण मंगल यादव हा काल संध्याकाळी ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्म १ आणि २ या धिम्या मार्गावरील उच्चदाब असलेल्या विद्युत खांबावर चढला. हाकेच्या अंतरावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोरुग्ण असलेला मंगल यादव हा ठाण मांडून बसल्याने एकच खळबळ उडाली. लोहमार्ग पोलिसांनी त्वरित कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील उच्चदाबाच्या वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, अग्नीशमन दल आणि बघ्यांची गर्दी होती. तर दुसरीकडे विद्युत पुरवठा खंडित केल्याने कल्याणकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अग्नीशमन दलाने मंगल यादव याला समजावून खाली उतरविण्यात यश मिळवले आणि नंतर कल्याणकडे जाणा-या लोकल गाड्या पूर्ववत झाल्या. लोहमार्ग पोलिसांनी मंगल यादव याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मनोरुग्ण मंगल यादव हा मूळचा झारखंड राज्यातील सिमदेगा जिल्ह्यातील कुंदूरमुंडा या गावाचा असल्याचं सांगण्यात आले. ३ आठवड्यापुर्वी हा तरुण गीतांजली एक्स्प्रेसने ठाण्यात त्याच्या ओळखीच्यांसोबत कामाकरिता आला होता मात्र नंतर पुढचे त्याला काहीच माहित नाही असं तो तरुण पोलिसांना सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेल्वे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा तरुण मनोरुग्ण असल्याचं समोर आलं होतं मात्र सखोल चौकशीत हा तरुण मनोरुग्ण नसून तो काम न मिळाल्यामुळे असं वागला असावा अशी शक्यता ठाणे लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading