अवयव दाना बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील पहिले अवयव दान जनजागृती उद्यान ठाण्यात

देशभरात ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यातील हे पहिले उद्यान कै. इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानाची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येईल. त्यानंतर तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था या राजस्तरीय संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येईल. सध्याच्या घडीला एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. यात किडनी प्रत्यारोपणासाठी – ५,८३२, लिव्हर प्रत्यारोपणासाठी – १,२८४, हृदय प्रत्यारोपणासाठी – १०८, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपणासाठी – ३ एवढे रुग्ण प्रतिक्षेत आहेत.

महसूल सप्ताहाअंतर्गत आयोजित एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत ठाणे तहसील कार्यालयाच्या वतीने समाजातून वंचित असलेल्या ठाणे तालुक्यातील 45 तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. आता या योजनेअंतर्गत तृतीय पंथीय नागरिकांना निवृत्ती वेतनाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महसूल सप्ताहाअंतर्गत ठाणे तहसील कार्यालयाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी विकास गजरे, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यानुसार एक ऑगस्ट पासून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता संजय गांधी निराधार पेन्शन दरमहा जमा होणार आहे. यापुढील काळात देखील ठाणे तालुक्या अंतर्गत तृतीयपंथी नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी म्हणून संजय गांधी योजनेसह महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे, ठाणे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading