ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुली करण्याकरिता महापालिकेतर्फे मोहिम राबवली जात असून काल महानगर टेलिफोन निगमच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रभाग स्तरावरून थकीत मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. त्यानुसार महानगर टेलिफोन निगमच्या गरूडा आणि डॉल्फीन या कंपनीने महापालिका क्षेत्रात उभारलेल्या मोबाईल टॉवर क्षेत्राची मालमत्ता कराची ६८ लाखांची रक्कम थकीत होती. महानगर टेलिफोन निगमला वारंवार कळवूनही यावर काहीच कार्यवाही न झाल्यानं महापालिकेच्या कर वसुली कारवाई अंतर्गत महानगर टेलिफोन निगमच्या चरई दूरध्वनी केंद्राच्या इमारतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली. मालमत्ता धारकांवर जप्ती आणि लिलावाची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची देय रक्कम तात्काळ जमा करावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. मालमत्ता कर हा ऑनलाईन अथवा डीजी ठाणे या प्लॅटफॉर्मवरही जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
